मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवारांविषयी आश्लाघ्य भाषा वापरत ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार,’ अशी फेसबुक आणि ट्विटरवरील पोस्टद्वारे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
एका ट्विटर हँडलवरून आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. यापैकी फेसबुकवरील पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’ अशी धमकी देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरून अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरून मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या दोन्हीची राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना माहिती दिली. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरे वाईट झाल्यास त्याला देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राचे गृहखाते सातत्याने अपयशी ठरत आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत तर केंद्रीय गृह खात्याने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. अमित शहा यांनी महिला सुरक्षेबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र हा शांतताप्रेमी आहे. अशा महाराष्ट्रात सातत्याने घटना अशा घडत आहेत, हा काही योगायोग नाही. याचा अर्थ कुठला तरी अदृश्य हात काहीतरी करतच आहे. शरद पवारांची सुरक्षितता आणि त्यामागे कोणाचा अदृश्य हात आहे, हे समोर येणे महत्वाचे आहे. या सगळ्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.