बल्लारपूरच्या क्रीडा संकुलात होणार राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान आयोजन


चंद्रपूर:  बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीयस्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे.

२०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट ठेऊनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास ३ हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या पथकाने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले. जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

स्पर्धा दर्जेदारच होतील-बनसोडेः चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहेत. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास क्रीडा मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.

राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मिशन ऑलिम्पिक २०३६ ची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातून होईल, असेही ते म्हणाले.

 ‘तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कारांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना १ कोटी रुपये, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंना ७५  लाख रुपये, तर कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना ५० लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे, असे बनसोडे म्हणाले.

पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रस्तावित आहे. पुणे येथे ऑलिम्पिक भवनाकरीता पहिल्या टप्प्यात ७५  कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने २९  ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या नावाने आता १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!