मुंबईः मध्यंतरी गडगडलेले कांद्याचे भाव पुन्हा वाढल्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेडने मोबाइल व्हॅनद्वारे रास्तदरातील कांद्याची विक्री सुरू केली असून नाफेडच्या या मोबाइल विक्री केंद्रावर कांदा २५ रुपये किलो दराने उपलब्ध करून दिला जात आहे.
केंद्र सरकारच्या किंमती स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना महागाईची झळ बसू नये म्हणून देशात चणाडाळ, आटा व कांदा विक्री केंद्रे सुरू करण्यात येतात.
कांद्याच्या भावात झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता नाफेडने नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुंबई, ठाणे, पनवेल आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये कांदा विक्री केंद्रे सुरु केली आहेत. सध्या २५ मोबाइल व्हॅन केंद्रांद्वारे रास्तदरातील कांदा विकला जात आहे.
आगामी काळात १०० ठिकाणी रास्तदरातील कांदा विक्री केंद्रे सुरू करण्याची नाफेडची योजना आहे. नाफेडने ऐन सणासुदीच्या काळात रास्तदरातील कांदा विक्री केंद्रे सुरू केल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मधल्या काळात कांद्याची आवक कमी झाली परिणामी कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणेच नव्हे तर सणासुदीच्या काळात संपूर्ण राज्यभर कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज महिनाभरापूर्वीच वर्तवण्यात आला होता. त्यादृष्टीने उपाययोजनाही केल्या जात होत्या.
कांद्याच्या भाववाढीवर तोडगा म्हणून मुंबईच्या अनेक भागांमध्ये नाफेडकडून रास्तदरातील कांदा विक्री केला जात आहे. अवघ्या २५ रुपये किलो भावाने नाफेडच्या या मोबाइल विक्री केंद्रांवर कांदा विकला जात आहे.