बीडः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांना आज बीडमध्ये विरोधाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे हे आज सायंकाळी बीडमध्ये दाखल होताच मोठ्या जमावाने त्यांचा ताफा अडवला. ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशी घोषणा देत या जमावाने सुपाऱ्याही फेकल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत केले.
राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करत आहेत. आज सायंकाळी राज ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन झाले. मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी थांबले होते. तत्पूर्वीच मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला. जमावातील काही लोक ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत होते. त्यामुळे या जमावातील कार्यकर्ते हे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
परंतु या जमावातील अनेकांकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे राज ठाकरेंचा ताफा अडवणाऱ्या जमावातील कार्यकर्ते हे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते होते की उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक होते?, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु हे उद्धव ठाकरेंचेच शिवसैनिक असण्याची शक्यता आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे ज्या ठिकाणी स्वागत केले जाणार होते, त्या ठिकाणी या जमावाने सुपाऱ्या फेकल्या. ‘सुपारीबाज, सुपारीबाज’ अशी घोषणाबाजीही या जमावाने केली. त्यामुळे राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी जमलेले मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेला जमाव आमने-सामने आले आणि एकमेकांना भिडले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अखेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत केले आणि तणाव निवळला.
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की, आरक्षणाची गरजच नाही. आपल्याला केवळ पैश्यांचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसींबरोबरच आरक्षित प्रवर्गातील सर्वच समाज राज ठाकरे यांच्यावर संतापलेला आहे. त्या संतापाची प्रतिक्रिया आज बीडमध्ये पहायला मिळाली.