
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि बोगस मतदानावरून वादग्रस्त विधान करणारे शिवसेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी आज आपल्या मुलाला सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी मुलाला सोबत घेऊन ईव्हीएमचे बटनही दाबले. हा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड मतदान केंद्रावर आज सकाळी घडला.
आमदार विलास भुमरे हे आज सकाळी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन पाचोड येथील मतदान केंद्रात दाखल झाले. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी आ. विलास भुमरे यांच्या बरोबरच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली. आ. विलास भुमरे हे आपल्या मुलाला घेऊन ईव्हीएमजवळ गेले आणि त्यांनी मुलाला ईव्हीएमचे बटन दाबायला लावले.
या गंभीर प्रकारावरून आ. भुमरे यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले आहे. तो लहान आहे. त्याला ईव्हीएमवगैरे कळत नाही. मी फक्त त्याच्या बोटाला शाई लावायला लावली. माझे मतदान मीच केले, असा खुलासा आ. भुमरे यांनी केला आहे. आ. विलास भुमरे यांचे चुलत बंधू शिवराज भुमरे हे पाचोड जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
