
जळगावः सेवेत कायम करण्यासाठी संस्थाचालकांना अनेक वर्षापासून १५ लाख रुपये देऊन ठेवले परंतु त्यांनी सेवेत कायम केले नाही. उलट कंत्राटी कामावरूनही काढून टाकल्यामुळे तणावाखाली येऊन एका महाविद्यालयीन कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली. या घटनेमुळे संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक व मानसिक शोषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय अर्थात एमजे कॉलेजमध्ये महेश भास्करराव सावदेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. कंत्राटी सेवेऐवजी नियमित सेवेत घेऊन कायम करण्यासाठी संस्थाचालकांना अनेक वर्षांपूर्वीच १५ लाख रुपये देण्यात आले. परंतु त्यांनी सेवेत कायम तर केले नाहीच, उलट कंत्राटी सेवेतूनही काढून टाकल्यामुळे महेश सावदेकर यांनी स्वतःच्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप महेश सावदेकर यांच्या पत्नी यशोधरा सावदेकर यांनी केला आहे.
जळगाव शहरातील देविदास कॉलनीत राहणारे महेश भास्करराव सावदेकर (वय ५२) हे मुळजी जेठा महाविद्यालय अर्थात एम. जे. कॉलेजमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांची पत्नी यशोधरा कामावर गेल्या होत्या तर मुलगा क्लासेसला गेला होता. घरी एकटेच असलेल्या महेश सावदेकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला समजल्यानंतर त्यांनी तत्काळ महेश सावदेकर यांचे भाऊ अविनाश सावदेकर यांना माहिती दिली.
दाखवला जास्त, प्रत्यक्षात दिला कमी पगार
महेश सावदेकर हे मुळजी जेठा महाविद्यालय म्हणजेच एम.जे. कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला होते. नियमित सेवेत कायम करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही संस्थाचालकांना १५ लाख रुपये देऊन ठेवले आहेत. सावदेकर यांना महाविद्यालयात कोणतेही काम करण्यास सांगितले जात होते. ते करतही होते. संस्थेकडून त्यांना जास्त पगार दाखवला जायचा. त्या जास्तीच्या पगारावर सहीही घेतली जायची. मात्र प्रत्यक्ष पगार कमी दिला जायचा, असा आरोप महेश सावदेकर यांच्या पत्नी यशोधरा यांनी केला आहे.
हातापाया पडूनही घेतले नाही कामावर
एम.जे. महाविद्यालयाने मला कंत्राटी सेवेतून काढून टाकले आहे. त्यांच्या हातापाया पडलो, परंतु त्यांनी माझी विनंती ऐकली नाही आणि कामावर घेतले नाही. यापुढे महाविद्यालयात यायचे नाही, अशी तंबी मला संस्थाचालकांनी दिल्याचे महेश सावदेकर यांनी मला सांगितले होते. त्याच तणावाखाली ते अनेक दिवसांपासून होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे महेश सावदेकर यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई झाली करण्यात यावी, अशी मागणी यशोधरा सावदेकर यांनी केली आहे.
१५ लाख रुपये देऊनही संस्थेने महेश सावदेकर यांना नियमित सेवेत कायम केले नाही. उलट दीडमहिन्यापूर्वी कंत्राटी कामावरून काढून टाकले. कामावरून काढून टाकल्यानंतरही महेश सावदेकर हे संस्थाचालकांच्या भेटीसाठी वारंवार महाविद्यालयात गेले. परंतु त्यांना कामावर घेण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती, त्यामुळे ते तणावात होते, असे यशोधरा म्हणाल्या.
मृतदेह आणला महाविद्यालयाच्या प्रांगणात
महेश सावदेकर यांना एम.जे. महाविद्यालयाने कंत्राटी सेवेतून कमी केल्यामुळेच तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून केला गेला. संतप्त नातेवाईकांनी महेश सावदेकर यांचा मृतदेह एम.जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात आणून ठेवला. महेश सावदेकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे महाविद्यालय परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला.
