नांदेडः नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे भाजपच्या वतीने आयोजित ‘लाडक्या बहिणीचा देवाभाऊ’ कार्यक्रमात साड्या वाटपावरून रविवारी चांगलाच गोंधळ उडाला. महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. साड्या दोन हजार आणि त्या घेण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असल्यामुळे आयोजकांची पंचाईत झाली. साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्यामुळे साड्या वाटपापूर्वीच हा कार्यक्रम थांबवावा लागल्यामुळे भाजपच्या या कार्यक्रमाचा चांगलाच फज्जा उडाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आणि सत्ताधारी महायुतीकडून मतदारांना भुरळ घालण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर महिन्याला दोन हजार रुपये जमा केले जात आहेत. त्याचबरोबर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठे घरगुती साहित्याचे वाटप तर कुठे साड्यांचे वाटप असे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे भाजपच्या वतीने रविवारी ‘लाडक्या बहिणीचा देवाभाऊ’ कार्यक्रमात महिलांना साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाजप नेते बाळासाहेब पांडे, युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे नांदेड जिल्हाध्यक्ष ऍड. किशोर देशमुख, प्रदेश कार्यक्रारिणी सदस्य शेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर आणि जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके आदींच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमात आयोजकांकडून दोन हजार साड्या वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला आष्टी जिल्हा परिषद गटातील जवळपास सर्वच गावातून तीन हजारापेक्षा जास्त महिलांनी साड्या घेण्यासाठी गर्दी केली. साड्या घेण्यासाठी उडालेली महिलांची झुंबड पाहून आयोजकांना साड्या वाटपापूर्वीच हा कार्यक्रम बंद करावा लागला.
‘लाडक्या बहिणीचा देवाभाऊ’ कार्यक्रमाला महिलांची गर्दी जमवण्यासाठी या कार्यक्रमात साड्या वाटप होणार अशी वार्ता भाजप कार्यकर्त्यांनीच गावोगाव पोहोचवली होती. त्यामुळे सकाळपासूनच आष्टी जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावातील महिला तामश्यात कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. परंतु नियोजनाचा अभाव आणि साड्यांची अपुरी संख्या यामुळे अनेक महिलांना साड्या न घेताच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागल्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.
ज्या महिलांना या कार्यक्रमात साड्या मिळाल्या नाहीत, त्या महिलांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आता आम्ही साड्या घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडे जायचे का? असा संतप्त सवाल या हिरमोड झालेल्या महिलांनी केला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात साड्या घेण्यासाठी महिलांची उडालेली झुंबड पहायला मिळते. त्यामुळे भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळाचीच चर्चा जिल्हाभर ऐकायला मिळत आहे.