मुंबईः महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्या, या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केल्यापासून मराठा समाजातील एक घटक ‘सरसकट कुणबी’ होण्यास तयार नसल्याचे समोर आले होते. ‘हिंदू मराठा’ म्हणूनच आम्हाला आरक्षण द्या, कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण नको आहे, अशी मते सोशल मीडियावर मांडली जात असतानाच आता केंद्रीय मंत्री आणि मराठा समाजाचे नेते नारायण राणे यांनीही महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यास विरोध केला आहे.
महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले देऊ नका. सरसकट कुणबी दाखले द्या, ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. कोणी मागतेय म्हणून सरसकट दाखले देऊ नयेत. कुणाचे आरक्षण काढून घेऊन दुसऱ्याला देऊ नये, असे नारायण राणे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
जालना जिल्ह्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. निजामकालीन महसुली अभिलेख किंवा शैक्षणिक अभिलेखात उल्लेख असलेल्या मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबत विहित प्रक्रिया निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली.
राज्य सरकारचा हा शासन निर्णय जारी झाल्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याची मागणी पुढे रेटली. तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेला मराठा समाजातूनच विरोध सुरू झाला.
९६ कुळी मराठ्यांनी आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको आहे, मराठा हिंदू किंवा हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण हवे आहे, अशी भूमिका मांडायला सुरूवात केली. मराठा हिंदू किंवा हिंदू मराठा म्हणून आरक्षण मिळणार नसेल तर देऊ नका, पण आम्हाला कुणबी म्हणून घ्यायचे नाही, अशी उघड भूमिकाच काही जणांनी सोशल मीडियातून मांडली.
आता केंद्रीय मंत्री आणि मराठा समाजाचे नेते नारायण राणे यांनीही मराठ्यांना सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्यास विरोध केला आहे. सरसकट कुणबी दाखले द्या, ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नये. कोणी मागतेय म्हणून सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे. केवळ उपोषण मागे घेण्यासाठी बोलले नाही पाहिजे. जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे राणे म्हणाले.
राज्यात ३८ टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजातील गरीब वर्गाला आरक्षण द्यावे पण कुणाचेही काढून हे आरक्षण देऊ नये, असेही राणे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी जे उपोषण केले, त्यांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, असे राणे म्हणाले.