जालनाः महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्यात यावी, या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज गुरूवारी अखेर उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी फळांचा रस घेऊन मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आणि गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेली उपोषणाची कोंडी फोडण्यात मुख्यमंत्री शिंदे यशस्वी ठरले.
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यादरम्यान सातत्याने चर्चा सुरू होत्या. मराठा आरक्षणप्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला काही दिवसांची मुदत देण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवल्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे आंतरवाली सराटी येथे दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी फळांचा रस पिऊन १७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणप्रश्नावर आमरण उपोषण सुरू केल्यानंतर प्रारंभी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर निजामकालीन महसुली अभिलेख किंवा शैक्षणिक अभिलेखात उल्लेख असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली आणि या उपोषणाचा तिढा वाढत गेला.
त्यानंतर मराठा आरक्षणप्रश्नी ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला महिनाभराचा अवधी देण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी बुधवारी जाहीर केला. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे जोपर्यंत आंतरवाली सराटीत येत नाहीत, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केला.
बुधवारी सायंकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटी येथे जाणार होते. मात्र त्याआधी त्यांनी राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवून दिले आणि आज सकाळी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आंतरवाली सराटीत दाखल झाले. येथे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडले.
उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडले नाही, ते आज घडले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतो. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्याची वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्याची वेळ दिली आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.