आर्णीः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईमध्ये ५ किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत आर्णीच्या तहसीलदारांबरोबरच बाजार समितीकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे.
आर्णी तालुक्यातील शेतकरी गजानन शेळके हे १६ डिसेंबर रोजी त्यांच्या शेतातील कापूस विक्री करण्यसाठी आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किनार धर्मकाटा तोलाई केंद्रावर गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शेळके यांनी टाटा कंपनीच्या गाडी क्रमांक एमएच-४२ एएफ ०१०७ मध्ये कापूस भरून जय किसान धर्मकाट्यावर तोलाई केली. या धर्मकाट्यावर कापूस भरलेल्या गाडीची मोजणी केली असता कापसासह त्या गाडीचे वजन १ हजार ८६५ किलो असे नेट वजन जय किसान धर्मकाट्याच्या दर्शनी मीटरवर दाखवण्यात आले होते.
गाडीतील कापूस खाली करून पुन्हा गाडीचे वजन केले असता ते १ हजार ३६० किलो असे धर्मकाट्यावर देण्यात आलेल्या पावतीवर दाखवण्यात आले. परंतु धर्मकाट्याच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेल्या मीटरवर गाडीचे हेच वजन १ हजार ३५५ किलो दाखवण्यात आले.
तोलाईमध्ये तब्बल पाच किलो वजनाची तफावत असल्याचे लक्षात येताच शेतकरी शेळके यांनी रिकाम्या गाडीचे पुन्हा वजन करण्यास सांगितले आणि त्यांच्यासोबत असलेले किशोर जुडे यांना दर्शनी काट्यावरील वजन बघण्यास सांगितले. तेव्हाही तुलाईमध्ये तब्बल पाच किलो वजन कमी दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दर्शनी मीटरचा फोटो काढून घेतला तसेच धर्मकाटा ऑपरेटरला तुमच्या काट्यात तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
शेतकरी शेळके यांनी तोलाईमध्ये पाच किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर लगेच बाजार समितीच्या सचिवांना घटनास्थळी बोलावून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर शेतकरी शेळके यांना लेखी तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार शेळके यांनी लेखी तक्रार केली आहे.
जय किसान धर्मकाट्यावर तोलाईमध्ये वजन कमी दाखवून गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची शंका शेळके यांनी घेतली असून या रॅकेटमध्ये बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
तोलाई परवाना रद्द करा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईमध्ये तब्बल पाच किलो वजन दाखवून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असून जय किसान धर्मकाटा यांचा तोलाईचा परवाना तत्काळ रद्द करून त्यांना ५० हजार रुपयांचा दंड आकारावा आणि शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी, अशी मागणी गजाजन शेळके यांनी आर्णीचे तहलीदार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन जय किसान धर्मकाट्याविरुद्ध काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.