राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी


मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी थंडावली असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत, असे वाघमारे म्हणाले.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना: १६ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६, सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत
उमेदवारी अर्जांची छानणी: २२ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज माघार: २७ जानेवारी २०२६, दुपारी ३ वाजेपर्यंत.
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेनंतर
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी: ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा अशा

मराठवाडा विभाग: छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव.
कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

प्रत्येक मतदाराला दोन मते बंधनकारक

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देणे बंधनकारक आहे. त्यापैकी एक मत जिल्हा परिषद गटासाठी तर एक मत पंचायत समिती गणासाठी करावे लागणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी वाघमारे म्हणाले.

नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन

सर्व राजकीय पक्षांच्या मागणीनुसार या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उमेदवारी अर्जाबरोबरच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे वैधता प्रमाणपत्र नसेल, त्यांना समाज कल्याणमध्ये जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पावती सादर करावी लागेल आणि निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे वाघमारे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!