राज्यात पावसाचे होणार पुनरागमन, २१ जिल्ह्यांत दोन दिवसांत बरसणार मेघधारा!


मुंबईः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. शेतीतील उभी पिके करपून जाऊ लागली आहेत. अशात हवामान खात्याने राज्याच्या २१ जिल्ह्यांत दोन दिवसांत पावसाचा इशारा दिल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे.

६ आणि ७ सप्टेंबर  असे दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भातही समाधानकारक पूस पडेल, या दिवसात वातावरणात हलकासा गारवाही असेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

हवामान खात्याने शनिवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्टच्या काळात या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ७ सप्टेंबर रोजी विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे ७ सप्टेंबरला विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बऱ्यास दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. यंदा राज्याच्या अनेक भागात म्हणावा तसा पाऊसच झाला नसल्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस तूट भरून काढेल, असे वाटत असताना सप्टेंबर महिन्यातही राज्याच्या सर्वच भागात पाऊस पडणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *