
मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचाविषय ठरलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मुंबईच्या वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असा दावा करत राज आणि उद्धव यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आजारी असतानासुद्धा शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला हजर राहिले. त्यांनीच या पत्रकार परिषदेची सुरूवात केली. ‘आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा मंगलकलश उद्धव आणि राज यांच्या रुपाने आला आहे. महाराष्ट्राला केवळ ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात आणि आजच्या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे आता निश्चित आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.
प्रास्ताविक करून राऊतांनी माईक उद्धव ठाकरे यांच्या हाती दिला. परंतु उद्धव यांनी राज यांना पहिल्यांदा बोलण्याचा आग्रह धरला. मात्र राज ठाकरेंनीही तूच बोल असे म्हणत उद्धव यांनाच पहिल्यांदा बोलण्यास सांगितले आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेला सुरूवात केली.
कर्तव्य म्हणून एकत्र, नाते तुटणार नाही: उद्धव
‘आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. आज दिल्लीतील सत्ताधीशांच्या डोळ्यात मुंबई खुपत आहे. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि आता हे नाते तुटणारे नाही. जे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे स्वप्न पहात आहेत, त्यांचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप म्हणते कटेंगे तो बटेंगे, पण मी सांगतो- चुकाल तर संपाल. मराठी माणसाने आता एकत्र येण्याची वेळ आली आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यापुढे मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कुणी वाकड्या नजरेने पाहिले किंवा कपटी कारस्थानांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊनच आम्ही मैदानात उतरलो आहोत. मी सगळ्या मराठी जनांना सांगतो की, आता जर चुकाल तर संपाल. आता फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही. पण त्याचा वाटेला जर कुणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कोण किती जागा लढवणार, हे सांगणार नाहीःराज
उद्धव ठाकरेंनंतर माईक हातात घेत राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना (उबाठा) युतीची घोषणा केली. मला जे बाकी काही बोलायचे आहे ते जाहीर सभांमधून बोलेन. मात्र एका मुलाखतीत मी म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथूनच आम्ही एकत्र येण्याची सुरूवात झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. त्या राजकीय पक्षांमधील मुले पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही राज ठाकरे म्हणाले.
अल्लाह हाफिज… माझ्याकडे खूप व्हिडीओ!
सत्ताधारी पक्षांकडून ठाकरेंच्या युतीला मत म्हणजे मुस्लिम धार्जिण्या धोरणाला मत, अशी टिका केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आपल्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या निवडणूक प्रचारसभांतील उपक्रमाची आठवण करून दिली. ‘मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतो, ज्यात ते अल्लाह हाफिज म्हणतायेत. त्यामुळे या गोष्टी कुणी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत बरं का. ते जे बोलतील त्यावर माझे व्हिडीओ तयार असतील,’असे राज ठाकरे म्हणाले.
