मुंबईः राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कोणत्याही क्षणी होईल, असे सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून (शिंदे गट) सांगितले जात असतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र हा मंत्रिमंडळ विस्तारच होणार नसल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार केलाच जाणार नाही, असे दानवे यांचे म्हणणे आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीला जाऊन आले. या दोघांच्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबते झाल्याचीही चर्चा आहे. शिंदे- फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या दोघांकडूनही मंत्रिमंडळ विस्ताराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला जात असताना आणि भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) इच्छूक आमदार मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असतानाच दानवेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून राज्य सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जात आहे, असे दानवे म्हणाले. यांना आमदार सांभाळायचे आहेत. मग अशावेळी केवळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणा करायच्या. आता अधिवेशन येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाआधी होईल, असे आता ते सांगत आहेत. नंतर अधिवेशन झाल्यावर विस्तार करू, असे ते सांगतील. पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी आहे. ते फक्त घोषणाबाजी करत आहेत, असे दानवे म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी अजून दीडवर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची आणि आपली मंत्री म्हणून वर्णी लागण्याची वाट पहात आहेत, मात्र या ना त्या कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जात आहे. त्यामुळे या आमदारांत नाराजी आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहाज जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. लोकांना त्यांचा स्वतंत्र पालकमंत्री हवा आहे. लोकांची कामेच होत नाहीत, असे म्हटले होते.
पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत….
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामनातील अग्रलेखातून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही, त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्या याचेच आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हालायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे, असे सामनात म्हटले आहे.