पुणेः अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि ते भाजपशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होते उपमुख्यमंत्री बनले. शरद पवारांच्या संमतीनेच या राजकीय घडामोडी घडल्या की काय? अशी शंका तेव्हाच राजकीय वर्तुळात घेण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या नव्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ‘साहेब आणि मी तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आजही वेगळे नाही, काळजी करू नका,’ असे अजित पवार यांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात आले होते. शिरूरचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत जोरदार राजकीय टोलेबाजी केली.
शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणून पोपटराव गावडे तर बाबुराव पाचर्णे हे अजित पवारांचे समर्थक असल्याचा प्रचार शिरूरमध्ये झाल्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला. हा किस्सा सांगतानाच त्यांनी मोठे वक्तव्य केले.
अगदी सुरूवातीच्या काळात पोपटरावांनाही आठवत असेल. पोपटराव हे साहेबांचे उमेदवार आणि बाबुराव हे माझे उमेदवार असा प्रचार शिरूर तालुक्यात झाला होता. मात्र त्यावेळी मी म्हटलं होतं की साहेब आणि मी काही वेगळे आहोत का? आम्ही तेव्हाही वेगळे नव्हतो आणि आताही वेगळे नाही, काळजी करू नका, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
मी आज इकडे येण्यासाठी सकाळी साडेपाच वाजताच निघालो होता. लवकर कार्यक्रम आटोपून पुढे जावे असे मनात होते. तुम्ही सकाळी सात वाजताच कार्यक्रमाला जाता, पण इतक्या लवकर लोक कशी येतात? असा प्रश्न मला अनेकजण विचारतात. परंतु आपण लोकांना कशा सवयी लावतो, त्यावर ते अवलंबून असते. आपल्याला साहेबांनी सकाळपासून काम करण्याची सवय लावली, असेही अजित पवार म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजर राहू नये असा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा सूर होता.
तरीही पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच अजित पवारांचे हे नवीन वक्तव्य आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.