महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादीचे ९ आमदारही मंत्री!


मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज रविवारी सकाळी समर्थक आमदारांची मॅरेथॉन बैठक घेतल्यानंतर ३० समर्थक आमदारांसह राजभवन गाठले आहे. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवन दाखल झाले आणि अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनीही मंत्रिपदाची घेतली आहे.

अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

अजित पवार यांनी आज सकाळीच त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ पैकी ३० आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या आमदारांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

 या बैठकीत मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर अजित पवार हे समर्थक आमदारांना घेऊन थेट राजभवनावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ शिंदे-फडणवीसही राजभवनात आल्यानंतर अजित पवारांच्या शपथविधीची तयारी करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार बैठकीनंतर राजभवनावर पोहोचले होते. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु त्याबाबत सरकारकडून अधिकृतरित्या काहीच सांगितले जात नव्हते. अखेर आज दुपारीच अजित पवार यांचा राजभवनात शपथविधी  सोहळा झाला.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी उत्सूक असल्याचे बोलले जात होते. विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले होते. प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून अजित पवार हे समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असतानाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक बोलावली.

या बैठकीत मॅरेथॉन चर्चा झाल्यानंतर समर्थक आमदारांना घेऊन अजित पवार थेट राजभवनावर दाखल झाले. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला आहे.

कोण कोण होते बैठकीला?

 अजित पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार या बैठकीला हजर होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!