पोलिसांच्या अर्जित रजांची मर्यादा ३०० वरून ६०० पर्यंत वाढणार, सेवानिवृत्तीच्या वेळी खिशात खुळखुळणार जास्तीचा पैसा!


मुंबईः सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्टकचेऱ्यांचे कामकाज आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा कामाचा ताण यामुळे महाराष्ट्रातील पोलिसांना अनेकदा इच्छा असूनही रजा घेता येत नाहीत. पोलिसांना सेवानिवृत्तीला अशा शिल्लक राहिलेल्या रजांपैकी फक्त ३०० अर्जित रजांचे रोखीकरण केले जाते. उर्वरित रजा मात्र वाया जातात. परंतु आता पोलिसांच्या अर्जित रजांची संख्या ३०० वरून ६०० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असून राज्य पोलिस मुख्यालयाकडून सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून माहिती मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र पोलिस दलाची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना रजांची तशी वाणवाच असते. सततचा बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्टकचेऱ्याचे कामकाज आणि मंजूर पदाइतके मनुष्यबळ नसल्यामुळे येणारा अतिरिक्त कामाचा ताण यामुळे पोलिसांना इच्छा असूनही रजा घेता येत नाहीत. अनेकदा तर घेतलेल्या रजाही रद्द केल्या जातात. पोलिस दलात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या वेळी अशा शिल्लक राहिलेल्या रजांपैकी फक्त ३०० अर्जित रजांचेच रोखीकरण करून रक्कम दिली जाते. ३०० पेक्षा जास्त रजा असल्यास त्या वाया जातात.

रोखीकरण होणाऱ्या अर्जित रजांची मर्यादा ३०० एवढीच असल्यामुळे पोलिसांचे आर्थिक नुकसान होते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या अर्जित रजांची संख्या ३०० वरून ६०० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडून तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस मुख्यालयाकडून सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांची माहिती मागवण्यात आली आहे. सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांपैकी किती पोलिसांनी अर्जित रजांची ३०० ची मर्यादा ओलांडली होती, त्यांचे किती अर्जित रजांचे नुकसान झाले, याबाबतचा तपशील सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांकडून ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे राज्य पोलिस मुख्यालयाकडून प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. पोलिसांच्या अर्जित रजांची संख्या ३०० वरून ६०० पर्यंत वाढवल्यास राज्यातील पोलिसांचे मोठे आर्थिक नुकसान टळणार असून सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या खिशात जास्तीचे पैसे खुळखुळणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!