मुंबई: राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी-सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनुसार यास जबाबदार असलेल्या गृहपालाच्या पदाचा कार्यभार काढण्यात आला असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे देसाई म्हणाले.
राज्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या इमारती आणि जागेसंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षा आणि सोयीसुविधा संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.