मुंबईः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या पदवीवरच संशय व्यक्त केला असून माहिती अधिकार कायद्यांतर्गत मोदींच्या पदवीची मागणी करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मोदींची पदवी तर मिळाली नाहीच, उलट गुजरातच्या न्यायालयाने त्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला असून डीग्री काय, मोदी हा माणूसच फेक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने म्हटले असून १९९२ मध्ये डेव्हलप झालेला फॉन्ट १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा? असा सवाल करत मोदींच्या पदवीवर शंका घेतली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीच्या फोटो ट्विट केला आहे. डीग्रीच्या या फोटोमध्ये ‘मास्टर ऑफ आर्ट्स’ असे इंग्रजीत लिहिले आहे, तो इंग्रजी फॉन्ट मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने १९९२ मध्ये तयार केला आहे, असा दावा करण्यात आला असून १९९२ मध्ये तयार करण्यात आलेला फॉन्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या १९८३ सालच्या पदवी प्रमाणपत्रावर कसा? असा सवाल केला आहे.
‘जो फॉन्ट १९९२ मध्ये तयार करण्यात आला, तो फॉन्ट मोदींच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा? डीग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे,’ असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी मोदींच्या डीग्रीवर शंका घेत आहेत.
मोदींची डीग्री संसदेच्या प्रवेशद्वारावर फ्रेम करून लावा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीवर विरोधी पक्षातील विविध नेते शंका घेत टिकाटिप्पणी करत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘आपल्या प्रधानमंत्र्यांची ही जी पदवी आहे ती बोगस आहे, असे लोक म्हणतात. परंतु ‘एन्टायर पोलिटिकल सायन्स’ या संशोधन विषयावर ही एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी डीग्री असे मी मानतो. ही डीग्री नवीन संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फ्रेम करून लटकवायला हवी. म्हणजे लोक प्रधानमंत्र्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत,’ असा टोला संजय राऊत यांनी मारला आहे. मोदी यांच्या डीग्री प्रकरणावरून भारताच्या राजकारणात पुढील काही दिवस तरी रंगतदार चर्चा ऐकायला मिळेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.