मुंबईः अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
अटल सेतूवर प्रवासासाठी कारला ५०० रुपयांऐवजी २५० रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या दीडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे.
अटल सेतू उभारणीकरिता एकूण २१ हजार २०० कोटी रुपये खर्च आला असून त्यापैकी १५ हजार १०० कोटी इतके कर्ज घेण्यात आलेले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनाकरिता किमान ५०० रुपये इतकी बचत होईल.
अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पहिल्या ० ते ४ किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक ( नॉइस बॅरियर) व अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र व माहूल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या ४ ते १० किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसवण्यात आलेले आहे.
अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा एक वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.