मुंबईः एक्झिट पोलच्या गोंधळलेल्या निष्कर्षांत महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर दिसू लागल्यामुळे युती आणि आघाडीकडून संभाव्य राजकीय परिस्थितीवर खलबते सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. आम्ही सत्तेसोबत राहणे पसंत करू, असे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. म्हणजेच उद्याच्या निकालानंतर महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्हीपैकी कुणीही सरकार स्थापन करणार असेल तर त्यांच्यासोबत जाण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हीपैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा तर्क लावला जात आहे. अशा स्थितीत छोटे पक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करूनच सरकार स्थापन करावे लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून खलबते सुरू आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू, आम्ही सत्तेत राहयला निवडू!’ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेली ही भूमिका पाहता जर उद्या भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला संख्याबळ कमी पडले आणि त्यांना पाठिंबा देण्याएवढे संख्याबळ वंचित बहुजन आघाडीला मिळाले तर ते त्यांना पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होऊ शकतात. हीच बाब महाविकास आघाडीच्या बाबतीतही घडू शकते.
तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची चिन्हे नाहीत. निकालानंतर राजकीय खिचडी होण्याची शक्यता आहे. राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहणार आहेत, असे भाकीत प्रकाश आंबेडकरांनी मतदानानंतर केले होते. राष्ट्रीय पक्षांना सत्ता स्तापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अलंबून राहवे लागेल, असेही आंबेडकर म्हणाले होते.