राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल, म्हणाले ही ‘नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत’!


नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंदर्भात चालू असलेल्या खटल्यात दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची रद्द केलेली खासदारकी पुन्हा बहाल केली आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच सहभागी होण्याचा राहुल गांधी यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कोलारमध्ये आयोजित जाहीर सभेत मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे असते?  अशी खोचक टिप्पणी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली होती. त्यावर भाजपचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्या खटल्यात सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली होती. गुजरात उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती.

या खटल्यात २३ मार्च २०२३ रोजी महानगर दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरूंगवासाची कमाल शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने २४ मार्च २०२३ रोजी म्हणजेच अवघ्या २४ तासांत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. राहुल गांधी हे वायनाडचे खासदार आहेत.

महानगर दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सूरत सत्र न्यायालय आणि नंतर गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे राहुल गांधींनी १५ जुलै २०२३ रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या निर्णयाला स्थगिती दिली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जाईल, असा युक्तिवाद राहुल गांधी यांनी केला.

४ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे लोकसभेत परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. आज म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल केल्याची अधिसूचना जारी केली.

‘नफरत पर मोहब्बत की जीत’

लोकसभा सचिवालयाने वायनाड मतदारसंघातील खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर राहुल गांधी लगेच संसदेत पोहोचले. दुपारी १२ वाजात सुरू होणाऱ्या लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर ते संसदेत गेले. मात्र लोकसभा किंवा राज्यसभेचे कामकाज फारकाळ चालू शकले नाही. गोंधळामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगीत करण्यात आले.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर संसदेत पोहोचल्याचा व्हिडीओ शेअर करत ‘हा कोट्यवधी भारतीयांचा विजय आहे. असत्यावर सत्याचा विजय आहे. व्देषाविरुद्ध प्रेमाचा (नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत) विजय आहे,’ असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!