अकोल्यात मुस्लिमविरोधी नफरतीचा समर्थक आघाडीचा उमेदवार कसा?, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्याः कपिल पाटलांचे पवारांना पत्र


मुंबईः अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील हे बाबरी मशीद पाडण्याचे आणि मुस्लिमविरोधी नफरतीचे आजही समर्थन करतात. तरीही ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊन काँग्रेसने केलेल्या ऐतिहासिक चुकांचे पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही, असे असे समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

समाजवादी गणराज्य पार्टी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या या पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनावृत्त पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचा देण्याचा आग्रह धरला आहे. उद्या (१४ एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यापार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी शरद पवारांना हे पत्र लिहिलेले आहे. ते पत्र त्यांच्याच शब्दांत…

आदरणीय श्री. शरद पवार साहेब
सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिले. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही.

नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत. तथापि या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे.

दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता आणि सश्रद्ध माणसे मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचे ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिले आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत.

अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ-भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचे आणि मुस्लिम विरोधी नफरतीचे ते आजही समर्थन करतात.  तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे.

उद्या  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात. त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणे, संसद भवनात फोटोही न लावणे, मंडल आयोग दडपून ठेवणे अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचे पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *