मुंबईः या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावरून सध्या वाद सुरू आहे. पाटील आडनाव लावून गौतमी मराठ्यांचे पाटील हे आडनाव बदनाम करत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा एका मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे. त्यावर मी पाटील आहे तर पाटीलच लावणार, अशा शब्दांत गौतमीने सडेतोड उत्तर दिले आहे.
गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत आहे. कधी ती तिच्या लीक होणाऱ्या व्हिडीओमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या कार्यक्रमातील हावभाव आणि नृत्याचा पद्धतीवरून वादात सापडते. अशा चर्चेत असलेल्या गौतमीला मराठा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतीच जाहीर धमकी दिली आहे.
गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही. मराठ्यांचे पाटील हे नाव खराब करण्याचे तिचे षडयंत्र आहे, असे सांगत मराठा संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी गौतमीचे कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे.
या संदर्भात गौतमी पाटीलला माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता तिने अत्यंत सडेतोड शब्दांत उत्तर दिले आहे. माझे आडनाव जर पाटील आहे तर मी पाटीलच लावणार ना? असे गौतमी म्हणाली. गौतमी पाटीलने तिच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेणाऱ्यांनाही जाहीर आव्हान दिले आहे. मी कार्यक्रमात कुणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. चांगला पार पडतो. मला कोणी काय नावे ठेवतो, याने फरक पडत नाही. ज्याला काही प्रश्न असतील त्याने माझ्या कार्यक्रमावर येऊन माझा पूर्ण कार्यक्रम पहावा आणि मग बोलावे की काय चाललेय, असे गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटीलला सुषमा अंधारेंचा फुल्ल सपोर्ट
हा वाद सुरू असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट जाहीर केला आहे. नृत्यांगना असलेल्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाहीत किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाहीत. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा हि धमकी गौतमी पाटीललाच का बरे?, सुषमा अंधारे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा की एक तर तुमची नजर दूषित आहे. ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची, दोन पायाची माणूस आहे, पण तिचे माणूसपण स्वीकारणे तुम्हाला जड तायेत किंवा तिला तिथपर्यंत पोहोचालया भाग पाडणारी, त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटाच्या बळाच्या जोरावर अशी दडपशाही करता, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.