
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली.
अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय, एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भाने, एमपीएससीने मार्च २०१७ पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.
कशी करायची केवायसी?
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे:
१. आधार ऑनलाइन ई-केवायसी.
२. आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी.
३.आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी.
४.नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे.
