कर्नाटकच्या भाजप मंत्र्याने गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलेला भरसभेत लगावली थापड


बेंगळुरूः कर्नाटकच्या भाजप सरकारमधील एका मंत्र्याने त्यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आलेल्या महिलेला थापड लगावल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे. मंत्र्याने थापड लगावताच ही महिला त्या मंत्र्याच्या पायावर झुकताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काँग्रेसने मोदींना महिलांचा सन्मान आणि महिला सशक्तीकरणाची आठवण देत त्या मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्री व्ही. सोमन्ना हे चामराजनगर जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या महिलेला थापड लागवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे.

ही घटना शनिवारची आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारमधील घरकुल मंत्री व्ही. सोमन्ना हे चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यातील हंगला गावातील एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले होते. ते चामराजनगर जिल्ह्याचे प्रभारी मंत्रीही आहेत. या कार्यक्रमात १७३ लोकांना जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.

याच कार्यक्रमात केम्पम्मा नावाची एक महिला कार्यक्रमस्थळी आली. लाभार्थींच्या निवड प्रक्रियेत अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार ती मंत्री सोमन्ना यांच्याकडे करू लागली. ज्या लोकांची नावे काँग्रेस नेते नानजप्पा यांनी  सूचवले होते, त्यांनाच टायटल डीड देण्यात आली, असा आरोपही या महिलेने केला.

 व्हायरल व्हिडीओत ही महिला दिसत आहे. केम्पम्मा नावाची ही महिला मंत्री सोमन्ना यांच्या जवळ जाते आणि मालकी हक्क वाटण्याच्या प्रक्रियेवर सवाल उपस्थित करते. तेव्हा मंत्री सोमन्ना या महिलेला थापड लगावताना दिसत आहेत. त्यानंतर घटनास्थळी हजर असलेले पोलिस त्या महिलेला मंचावरून खाली खेचून नेत असताना दिसत आहेत. या घटनेवरून वाद होऊन राजकारण तापल्यानंतर रविवारी या महिलेने पत्रकारांना सांगितले की, मंत्री सोमन्ना यांनी तिला थापड लगावली नाही तर त्यांनी तिचा गाल थोपटला.

या घटनेनंतर कर्नाटकचे प्रभारी काँग्रेस सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कर्नाटकच्या बोम्मई सरकारची महिलांना दिवाळी भेट… मंत्री अबला महिलेला खुलेआम थापड लगावतात. थापड लगावल्यामुळे महिला जमिनीवर पडते. माफी मागण्याऐवजी मंत्री व्ही. सोमन्ना महिलेला पोलिसांकरवी बाहेर हाकलून देतात. मोदीजी आता म्हणाल?  मंत्री सोमन्नांची हकालपट्टी करा, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *