कानपूरः प्रियकर- प्रेयसीच्या प्रेमाचे किस्से तुम्ही भरपूर ऐकले-वाचले असतील. पंरतु कानपूरमध्ये सर्वांनाच धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. एका गर्लफ्रेंडचे तिच्या बॉयफ्रेंडच्याच बापावर प्रेम जडले आणि ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काहीही न सांगता त्याच्या बापासोबत पळून गेली.
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही हैरान करणारी घटना आहे. या घटनेची हकीकतही रंगतदार आहे. मूळचे औरैयाचे रहिवाशी असलेले कमलेश आपल्या २० वर्षाच्या मुलासोबत कानपूर येथे कामाच्या शोधात आले होते. ते चकेरी परिसरात राहू लागले. कमलेशचा मुलगा गवंड्याचे काम करायचा.
चकेरी रहात असतानाच कमलेशच्या मुलाचे तेथील एका २० वर्षीय तरूणी प्रेमसंबंध जुळले. आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी कधी कधी ही २० वर्षीय तरूणी कमलेशच्या घरी यायची. तिचा बॉयफ्रेंड घरी नसला तर ती बॉयफ्रेंडचा बाप कमलेशशीच गप्पा मारायची.
हळूहळू या तरूणीचे तिच्या बॉयफ्रेंडच्या बापावरच मन जडले. ती त्याच्याच प्रेमात पडली. आपली गर्लफ्रेंड आपल्याच बापाच्या प्रेमात पडल्याची कानगुणही बॉयफ्रेंडला लागली नाही. एक दिवस मार्च २०२२ मध्ये ही तरूणी कमलेशसोबत पळून गेली.
कमलेशचा मुलगा घरीच होता. त्यामुळे तरूणीच्या कुटुंबीयांना त्याच्यावर संशय आला नाही. तरूणीच्या कुटुंबीयांना चकेरी पोलिस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करूनही त्यांना काहीच धागेदोरे मिळत नव्हते.
पोलिसांनी जेव्हा कमलेशच्या मुलाची चौकशी केली तेव्हा सगळाच धक्कादायक प्रकार समोर आला. त्याने सांगितले की, माझ्या गर्लफ्रेंडला माझाच बाप घेऊन पळून गेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कमलेश या तरूणीसोबत दिल्लीत रहात आहे आणि तो एका कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, कमलेशच्या मुलाला आपल्या बापाचा प्रताप माहीत होता परंतु बदनामी आणि लाजेखातर तो गप्प बसला होता. पोलिसांनी कमलेशला पोलिस ठाण्यातच ठेवले आहे. तरूणीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोघांचेही जबाब नोंदवून घेतले जातील.
कमलेश आणि तरूणी दोघेही सज्ञान आहेत. सध्या ही तरूणी मला कमलेशसोबतच रहायचे आहे, असे सांगू लागली आहे. आता या तरूणीचा जबाब घेतला जाईल आणि ती जो जबाब देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. म्हणजेच तरूणी जर कमलेश सोबत राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली तर तिला पोलिसांकडून तशी परवानगी दिली जाईल. गर्लफ्रेंडचा हा कारनामा पहात बॉयफ्रेंडला मात्र हात चोळत बसावे लागणार आहे.