मुंबईः गंगापूर तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाच्या टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकामात अनियमितता झाल्याचे दिसून येत असून, याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, या प्रकरणात अनुदान संबंधितांना प्रदान करण्यात आले असल्याने अपहार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत पंचायत समिती गंगापूर मधील १३४६ लाभार्थ्यींनी वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ११४९ अर्जदारांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्याच्या नोंदीही घेण्यात आल्या असून आज अखेर ९५० लाभार्थ्यींच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे, असे पाटील म्हणाले.
या अनुदान वाटपासंबंधी विविध बाबींची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ५ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने प्रोत्साहन अनुदानाचा अपहार अथवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल दिला असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.