
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाने (Income Tax) नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित चार्टर्ड अकाऊंटन्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी स्वतःच ही माहिती दिली. यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत, हे विधान फक्त माझ्यासाठीच आहे, असे म्हणत शिरसाट यांनी प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीची माहिती दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील व्हिट्स हॉटेल प्रकरणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांची प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरूनच मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाने ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती तर २०२४ च्या निवडणुकीवेळी तुमची संपत्ती इतकी कशी झाली? अशी विचारणा प्राप्तिकर विभागाने या नोटिशीत केली आहे. या पैशाबाबत ९ तारखेला खुलासा करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. पैसे कमावणे सोपे आहे, पण ते कसे वापरायचे हे अवघड झाल्याचे मंत्री संजय शिरसाट या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरातील जुने वेदांत आणि आता व्हिट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या हॉटेलच्या लिलावावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले होते. शिरसाट यांच्या मुलाने व्हिट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत हॉटेलची बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये असताना हे हॉटेल केवळ ६७ कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते.
शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली तरी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही तो उपस्थित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणाही केली आहे.
सत्ताधारी गटातील मंत्र्याविरोधातच मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि त्या पाठोपाठ प्राप्तिकर विभागाने बजावलेली नोटीस ही अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना आहे. आता प्राप्तिकर विभागाकडून मंत्री संजय शिरसाट यांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार का आणि त्यांची चौकशी करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दबाव टाकण्याचा प्रयत्न?
या नोटिशीच्या माध्यमातून सरकारकडून शिवसेनेवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या माध्यमातून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, असे म्हणता येणार नाही. प्राप्तिकर विभाग त्यांच्या पद्धतीने काम करत असतो. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. त्यांना हवी ती माहिती देऊ. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. त्यांना एखादी तक्रार आली आणि त्यांना काही वाटले तर अशा प्रकरणांमध्ये तपास करण्याचा त्यांचा अधिकार असतो, असे संजय शिरसाट म्हणाले.
