मुंबईः राज्याच्या बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून या दोन जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह राज्यातील नऊ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी राज्यासाठी पावसाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, गोंदिया, नागपूर या नऊ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता आपत्ती निवारण यंत्रणेसह स्थानिक स्वराज संस्थांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्यांना कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज असा-
सोमवार, २२ जुलैः रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
मंगळवार, २३ जुलैः रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बुधवार, २४ जुलैः पुणे, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुरूवार, २५ जुलैः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.