अयोध्येतील हॉटेलमध्ये महिला भक्तांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक


अयोध्याः उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भक्त हॉटेलच्या बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे व्हिडीओ चित्रित करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या हॉटेल कर्मचाऱ्याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्या मोबाइलमध्ये अनेक अश्लील क्लिप्स आढळून आल्या आहेत.

सौरभ तिवारी (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल कर्मचाऱ्याचे नाव असून तो बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या व्हीआयपी दर्शन मार्ग गेट क्रमांक ३ पासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या राजा गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये तो कामाला आहे. राम मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भक्त या हॉटेलच्या बाथमरूममध्ये आंघोळ करतानाचे व्हिडीओ तो लपून चित्रित करत होता.

पीडित महिला अन्य चार जणांसह राम मंदिराच्या दर्शनासाठी वाराणसीहून आली होती. गुरूवारी रात्री राम मंदिराच्या व्हीआयपी दर्शन मार्ग गेट क्रमांक ३ समोरच असलेल्या राजा गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये त्यांनी दोन खोल्या बुक केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ही महिला हॉटेलच्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना सौरभ तिवारी हा मोबाइलवर व्हिडीओ बनवत होता.

बाथमरूबाहेर त्या महिलेला आरोपीची सावली दिसली. त्यानंतर ती महिला आरडाओरड करत बाथमरूममधून बाहेर आली. महिलेचा आवाज ऐकून हॉटेलमधील इतर लोकही धावले आणि त्यांनी आरोपीला पकडले. इतक्यात एका महिलेने पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, आपण आंघोळ करत असताना कोणीतरी व्हिडीओ काढत  असल्याचे लक्षात येताच पीडित महिला घाबरली आणि बाथरूम बाहेर येऊन मदतीसाठी ओरडली. हॉटेलमधील इतर पुरूषांनी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ते धावले. त्यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर त्याला रामजन्मभूमी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी सौरभ तिवारीच्या मोबाइलची तपासणी केली असता सगळेच थक्क झाले. त्याच्या मोबाइलमध्ये अनेक अश्लील क्लिप्स आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून त्याच्याकडून आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही एक अतिशय गंभीर बाब असून माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे, असे अयोध्याचे मंडळ अधिकारी आशुतोष तिवारी यांनी सांगितले. दरम्यान, राजा गेस्ट हाऊस या हॉटेलचे बांधकाम अयोध्या विकास प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेताच बांधण्यात आले होते. त्यामुळे ते सील करण्यात आल्याचे प्राधिकरणाचे सचिव सत्येंद्र सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!