महाराष्ट्राने कधीच न विकणारा पँथर गमावलाः हाडामासाचा पँथर विजय वाकोडे यांचे निधन


परभणीः आंबेडकरी चळवळीसाठी आपले अख्खे आयुष्य समर्पित करणारे हाडाचे पँथर विजय वाकोडे यांचे आज सायंकाळी ह्दयविकाराने निधन झाले. विजय वाकोडे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे आयुष्य झोकून देणारा हाडामासाचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी समुदायाचा उसळलेला उद्रेक आणि त्यानंतर पुकारलेला बंद यादरम्यान विजय वाकोडे यांची भूमिका महत्वाची होती. परभणी शहरातील आंबेडकरी समुदाय विजय वाकोडे यांच्या शब्दाला मानणारा होता.

बंददरम्यान झालेली दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेवरून अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या तरूण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. आज सोमनाथच्या मृतदेहावर हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात विजय वाकोडे ठाण मांडून बसले होते. तेथे त्यांनी केलेले भाषण शेवटचे ठरले. या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली होती.

आज सायंकाळी सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह परभणीत पोहोचल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ते अंत्ययात्रेतही होते. अंत्ययात्रेनंतर ते सायंकाळी साडेसहा वाजता घरी निघाले.

अंत्ययात्रेतून घरी परतत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मदतीन वाकोडे एका खासगी रूग्णालयात दाखल झाले. तेथे उपचार सुरू असतानाच ह्रद्यविकाराने त्यांचे निधन झाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!