
मुंबईः गुजरातवर तयार झालेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती विदर्भ, ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकल्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम रहाण्याची शक्यता आहे. तर बुधवार आणि गुरूवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गुजरातवर तयार झालेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती विदर्भ, ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने पुढे सरकल्यामुळे मोठ्या भूभागावर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस विदर्भातील उष्णतेची लाट कायम रहाणार आहे. चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती व नागपूर जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या दिशेने सरकलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती पूर्वेच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता असल्यामुळे बुधवार आणि गुरूवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वर्षी उष्णतेची लाट लवकर सुरू झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. गेल्या वर्षी एवढे तापमान ५ एप्रिल रोजी नोंदले गेले होते. कधी कधी मार्चमध्ये तापमानात अशी वाढ नोंदली जाते.