टीईटी-२०२४ परीक्षेतील राखीव निकालांवर २५ मार्चपासून सुनावणी, ७८६ उमेदवारांना म्हणणे मांडण्याची संधी!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत राखीव ठेवण्यात आलेल्या निकालांची सुनावणी २५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार असून या सुनावणीत निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या ७८६ उमेदवारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या उमेदवारांना आपले म्हणणे मांडता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत २५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सकाळी ११ वा. सुनावणी होणार आहे.

या सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवार निहाय नियोजन दिले असून त्यानुसार उमेदवारांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात उपस्थित राहणेबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल, एसएमएस व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी त्यांना कळवण्यात आलेल्या दिवशी सकाळी ११ वा. स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. हजर न राहिल्यास उमेदवारांना या प्रकरणी काही सांगावायचे नाही असे गृहित धरुन त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील.

सुनावणीच्या वेळी उमेदवारांनी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र, (चालक, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) यापैकी कोणतेही एक यासह स्वत: उपस्थित राहावे.

सुनावणीच्या वेळी उमेदवारांच्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही. उमेदवारांना स्वतःच उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे लागेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या श्रीमती अनुराधा ओक यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!