‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक बापाकडून लेकीला अमानुष मारहाण, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू


सांगलीः नीटच्या सराव परीक्षेत मुलीला कमी गुण मिळाल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या बापाने रागाच्या भरात जात्याच्या लाकडी खुंट्याने केलेल्या अमानुष मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. धोंडीराम भोसले असे मुलीचा बळी घेणाऱ्या मुख्याध्यापक बापाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

धोंडीराम भोसले हा नेलकरंजी येथे खासगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. त्याची १७ वर्षीय मुलगी साधना हिने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा दिली होती. साधनाला नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही. याचा राग मनात धरून धोंडीराम भोसले याने शुक्रवारी (२२ जून) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नीट परीक्षेत कमी गुण कसे पडले? असे विचारत जात्यात्या लाकडी खुंट्याने अमानुष मारहाण केली.

कोणताही मागचा पुढचा विचार न करता धोंडीराम भोसलेने नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा राग लेकीवर काढला आणि तिला अमानुषपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली.

मुलगी गंभीर जखमी होऊनही मुख्याध्यापक धोंडीराम भोसलेने तिला शुक्रवारी रात्रीच रुग्णालयात दाखल केले नाही. शुक्रवारी रात्री साधनाला अमानुष मारहाण केल्यानंतर शनिवारी सकाळी धोंडीराम भोसले योग दिनाच्या कार्यक्रमासाठी निघून गेला. साधना घरातच बेशुद्धावस्थेत पडलेली होती. घरी परतल्यानंतर धोंडीरामने तिला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

आपल्या अमानुष मारहाणीत साधनाचा मृत्यू झाल्याचे धोंडीराम भोसलेने लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु शवविच्छेदन अहवालातून त्याचे हे कृत्य समोर आले. त्यानंतर साधनाची आई प्रिती भोसले यांनी रविवारी (२२ जून) रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

साधना ही अभ्यासात हुशार मुलगी होती. तिला दहावीला ९२.६० टक्के गुण मिळाले होते. बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिने तयारी सुरू केली होती. साधनाला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यासाठी तिला नीटची खासगी शिकवणी लावण्यात आली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा घेण्यात आली. नीटच्या या सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. त्यामुळे रागात आलेल्या धोंडीरामने घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने तिला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला जबर मार लागला होता.

धोंडीराम भोसलेला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी साधना आटपाडीतच बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. धोंडीराम भोसलेची पत्नी प्रिती या नेलकरंजी गावच्या सरपंच होत्या. तर धोंडीराम भोसलेचे वडील भगवान भोसले हे गावचे पोलिस पाटील होते. अशा या कुटुंबात ही अमानुष घटना घडली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!