पुणेः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या लोकांनी स्वतःच्या मुलांचे नाव कधी शिवाजी ठेवले नाही. आरएसएसच्या नागपूर कार्यालयात शिवाजी महाराजांचा फोटो कधी बघायला मिळाला नाही. हे मतांचे राजकारण आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ, जमेल तसे वाटून खाऊ आणि राज्यात हिंदू-मुस्लिम मतभेद करू, असे लोक सध्या राज्यात दिसत आहेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाचे नाव घेऊन ज्याला मते मिळतात तोच औरंगजेब म्हणतो. दुसरीकडे औरंगजेबाला विरोध करत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मुखात एक आणि पोटात एक घेऊन राजकारण करणारेही आहेत. आरएसएसच्या लोकांनी स्वतःच्या मुलांचे नाव कधी शिवाजी ठेवले नाही. शिवाजी महाराजांचा फोटो आरएसएसच्या नागपूर कार्यालयात कधीही बघायला मिळाला नाही. त मतांचे राजकारण आहे. काहींना शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय मते मिळत नाहीत तर काहींना औरंगजेबाचा उदोउदो केल्याशिवाय जमत नाही. त्यामुळे यांची मिलीभगत आहे. आम्ही दोघे भाऊ भाऊ, जमेल तर वाटून खाऊ आणि राज्यात हिंदू-मुस्लिम मतभेद करू, असे लोक सध्या राज्यात दिसत आहेत, असे वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
अजित पवारांच्या बंडानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ हे भाजपसोबत गेले आहेत. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, सगळे भाजपसोबत जातील पण भुजबळ जातील हे कोणालाच वाटले नव्हते. भुजबळ यांच्या तोंडी मोदींचे नाव येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण हे जे सगळे काही आहेत ती सत्तेची लाचारी आहे. भुजबळ आता ओबीसींचे राहिले नाहीत. भविष्यात त्यांना राजकीय संकटांचा सामना करावा लागणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात मोठा आनंद भेटतो की काय असे आता वाटू लागले आहे. काल-परवापर्यंत ज्यांना चोर, डाकू म्हणत होते, त्यांच्या टोळीत घुसून मलिदा खाण्याची प्रवृत्ती पुढे आली आहे की काय, असे जनतेला वाटू लागले आहे. आज जे लोक पक्षातून बाहेर गेले आहेत, त्याचा त्या पक्षावर काही परिणाम होईल, असे अजिबात वाटत नाही. शिंदे सेनेचे फक्त दोन खासदार निवडून येतील, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचेसुद्धा तेच आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.