एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेची हॉलतिकिट्स व्हायरल, डेटा लिक झाल्याच्या दाव्यामुळे विद्यार्थी गोंधळले; पण…


मुंबईः  एमपीएससीच्या  गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकिट्स) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टेलिग्राम लिंकद्वारे ८० ते ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे लिक झाल्याची माहिती पुढे येत असून ही टेलिग्राम लिंक व्हायरल करणाऱ्यांकडे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त  पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालेला असून एमपीएससीने या प्रकाराची तत्काळ दखल घेत विद्यार्थ्यांचा कुठलाही वैयक्तिक डेटा लिक झालेला नाही. फक्त हॉलतिकिटची लिंक शेअर करण्यात आली आहे, असा खुलासा एमपीएससीने केला आहे.

टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेल्या लिंकमध्ये एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा देणाऱ्या ८० ते ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटची लिंक शेअर करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी एमपीएससीने या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची हॉलतिकिट्स ऑनलाइन पद्धतीने वितरित केली आहेत. परंतु  टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या लिंकमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट्स एकाच लिंकवर शेअर करण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पोर्टल लॉगइन, फी पावती, अपलोड कागदपत्रे, आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि इतर वैयक्तिक माहितीही उपलब्ध असल्याचा दावा या टेलिग्राम पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची केवळ वैयक्तिक माहितीच नव्हे तर ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिकाही ही लिंक व्हायरल करणाऱ्याकडे उपलब्ध असल्याचा दावा या टेलिग्राम पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

ही टेलिग्राम पोस्ट वेगाने व्हायरल झाल्यानंतर या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्याची दखल घेत एमपीएससीने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. एमपीएससीच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा वैयक्तिक डाटा उपलब्ध असल्याचा टेलिग्राम पोस्टमधील दावा पूर्णपणे खोटा आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्रे २१ एप्रिल रोजी आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे.

ही बाब निदर्शास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहेत. या टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही’, असे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे.

या टेलिग्राम चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक डाटा आणि आगामी परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा आहे. अशाप्रकारे कोणताही डाटा किंवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही. प्रवेशपत्रे लिक करणाऱ्या टेलिग्राम चॅनलच्या ऍडमीनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही एमपीएससीने म्हटले आहे. ही परीक्षा पूर्वनियोजित वेळेनुसारच होईल, असेही एमपीएससीने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!