मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधाने केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईच्या शिफारसीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपालांविरोधात सध्या राज्यात असलेला प्रचंड रोष शांत करण्याच्या दृष्टीने केलेली कारवाई, असे याकडे पाहिले जात आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यासमोरच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करतानाच शिविगाळ केली होती. त्यानंतर सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले होते.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतानाच सर्वपक्षीय महिला आमदार-खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली असून संबंधित मंत्र्यांविरुद्ध उचित कारवाई करावी, अशी शिफारस असलेले पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
‘महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी ट्विट करून दिली. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा लवकरच ‘ करेक्ट कार्यक्रम’ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांनी साधलेले टायमिंगही चर्चेतः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्यांवरून भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. खुद्द भाजपचेच राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांना हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांबरोबरच पक्षातीलच काही लोकप्रतिनिधींचाही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रचंड राग आणि रोष आहे.
राज्यपालांच्या विरोधात राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व पक्षीय महिला आमदार-खासदारांनी मंत्री सत्तारांच्या विरोधात दिलेले निवेदन राज्यपाल कोश्यारींनी पंधरा-वीस दिवसांनंतर पोतडीतून हळूच बाहेर काढले आणि ते उचित कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. विरोधकांचा रोष कमी करण्यासाठीच राज्यपालांनी ही खेळी खेळल्याची चर्चाही होत आहे.