नवी दिल्लीः यावेळी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला देशातील लोकांनी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असे फर्मान सरकारने जारी केले आहे. म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रियकर-प्रेयसी, पत्नी, मित्र, बहीण-भाऊ, आईवडिलांना अलिंगन देण्याऐवजी गायीला मिठी मारा आणि काऊ हग डे साजरा करा!
वसंत ऋतू आणि व्हॅलेंटाइन डे सप्ताह यावेळी एकाच वेळी येतो आहे. त्यामुळे लोकांचे प्रेम ओसंडून वाहू लागले आहे. प्रेमाच्या बाबतीत सरकारी बाबू काय आणि सर्वसामान्य माणूस काय सारखेच! तसे तर प्रेम प्राणीही करतात, ते व्यक्त करू शकत नाहीत, एवढाच काय तो फरक!
प्रेमाच्या या सप्ताहात एक खास दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठीही निश्चित करण्यात आला आहे, तो म्हणजे व्हॅलेंटाइन डे! प्रेमाचा हा दिवस ‘आणखी उत्साहा’ने साजरा करण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळ म्हणजेच ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून १४ फेब्रुवारीला, व्हॅलेंटाइन डे हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करा, असे निर्देश दिले आहेत.
या परिपत्रकानुसार, गाय ही भारताची संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिला कामधेनू आणि गौमाता म्हणूनही ओळखले जाते. गाय ही आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आईच्या समान आहे.
पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रसार आणि प्रभावामुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपण आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळपास विसरून चाललो आहोत, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.