छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): प्रमोटी आयएएस अधिकारी मधुकर आर्दड यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. आर्दड यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आणि मंगळवारच्या वृत्तपत्रात तब्बल पानभर जाहिरात देऊन त्यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडून तटस्थपणे प्रशासनाचा गाडा हाकण्याची अपेक्षा असते, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल पानभर जाहिराती देऊन व्यावसायिकांकडून शुभेच्छा दिल्या जात असतील तर अशा अधिकाऱ्यांकडून ‘तटस्थ’ आणि न्याय्य भूमिकेची अपेक्षा तरी कशी करायची? असा सवाल आज ही जाहिरात पाहून अनेक जण विचारू लागले आहेत.
राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी त्यांच्या निवड अथवा नियुक्तीबद्दल अभिनंदन करणाऱ्या पान-पान जाहिराती आपल्या समर्थकांना स्वतःच पैसे देऊन प्रसिद्ध करून घेत असतात आणि रस्तोरस्ती-गल्लोगल्ली ‘सेल्फ स्पॉन्सर्ड’ भल्या मोठ्या होर्डिंग्जही लावून घेत असतात. परंतु प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची बदली अथवा नव्या ठिकाणी झालेल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करणाऱ्या जाहिराती अथवा होर्डिंग्ज आजपर्यंत कधीच पाहण्यात आलेल्या नव्हत्या. मधुकर आर्दड यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या पानभर जाहिरातीमुळे ही ‘उणीव’ भरून निघाली आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी मग भलेही ते पदोन्नतीने म्हणजेच मागच्या दाराने या सेवेत दाखल झालेले असले तरी या सेवेची प्रतिष्ठा आणि आब राखत आलेले आहेत. त्यांच्या कृतीतून आणि वर्तनातून त्यांनी आयएएस सेवेची प्रतिष्ठा आणि दबदबा कायम राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. पानभर जाहिराती द्यायला लावून आजवर एकाही आयएएस अधिकाऱ्याने एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रसिद्धीचा हव्यास दाखवल्याचे एकही उदाहरण सापडत नसताना औरंगाबादेत मात्र त्या उदाहरणाची पायाभरणी झाल्याचेच दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या मधुकर आर्दड यांना ‘हार्दिक हार्दिक शुभेच्छा’ देणाऱ्या जाहिरातीने दाखवून दिले आहे. आता या अधिकाऱ्यांनाही राजकीय नेत्यांप्रमाणेच आपल्या नियुक्तीचा महिमामंडन सोहळा साजरा करून घेण्याचा सोस आवरेनासा झाला की काय? अशी चर्चा या जाहिरातीच्या निमित्ताने होत आहे. सोशल मीडियावर या जाहितीवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रशासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तटस्थ आणि न्याय्य भूमिका घेऊन प्रशासनाचा गाडा चालवायला हवा. प्रशासन चालवताना कोणाच्याही आणि कोणत्याही हितसंबंधांना बळी न पडता त्यांनी निर्णय प्रक्रिया राबवली पाहिजे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. परंतु एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जर व्यावसायिकांकडून लाखो रुपये खर्च करून पानभर जाहिराती प्रसिद्ध करून शुभेच्छा दिल्या जात असतील, स्वागत केले जात असेल तर ‘नमनालाच व्यावसायिक हितसंबंध’ आणि निहित स्वारस्याचा वास येऊ लागतो आणि तो अधिकारी त्या ठिकाणी नेमके कोणाचे भले करण्यासाठी बदली करून आला किंवा त्याने ती पोस्टिंग मिळवली, याबाबतचे अंदाजही बांधले जाऊ लागतात.
मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली पानभर जाहिरात केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर प्रशासनातही चर्चेचा विषय ठरली आहे. विभागीय आयुक्त हा त्या विभागाचा महसुली प्रमुख असतो. विभागीय आयुक्ताला क्वासी ज्युडिशियल म्हणजेच अर्धन्यायिक अधिकारही असतात. विभागीय आयुक्तांना वादग्रस्त महसुली प्रकरणात सुनावणी घेऊन त्यावर न्यायनिवाडाही करायचा असतो. अशास्थितीत व्यायवसायिक हितसंबंध किंवा निहित स्वारस्य प्रस्थापित करण्यासाठी पानभर जाहिराती देऊन अधिकाऱ्यांना खुश केले जात असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून तटस्थ न्यायनिवाड्याची अपेक्षा तरी कशी करायची? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.