नांदेडः नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बिलोली तालुक्यातील धुरंधर राजकारणी बाबाराव जमनाजी एंबडवार (वय ७२) यांचे शनिवारी रात्री अपघातील निधन झाले. पुणे- सोलापूर महामार्गावरील माळवत चिखली गावाजवळ त्यांची कार ट्रकला धकडली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एंबडवार हे मुलाला भेटण्यासाठी कारने पुण्याला जात होते. पुणे- सोलापूर महामार्गावर माळवत चिखली गावाजवळ शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार रस्त्यात उभा असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात एबंडवार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एंबडवार यांचे चालक करीमखान पठाण व रामचंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्यानंतर जवळपास दीडतास मदत मिळू शकली नाही. त्यामुळे एंबडवार हे कारमध्येच अडकून होते. दीडतासांनंतर क्रेनच्या साह्याने त्यांचा मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आला. एंबडवार यांच्या पार्थिवावर आज २ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोल्हेबोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे १२ वर्षे सभापती, बिलोली पंचायत समितीचे सभापती, नांदेड जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष, आरोग्य व शिक्षण सभापती आणि शिवसेनेकडून दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष असा एंबडवार यांचा राजकीय प्रवास होता.