
मुंबईः बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात पोलिसांचा सहभाग उजागर करत त्यांनाही आरोपी करण्याची मागणी लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी येथे पोलिसी अत्याचारात मृत्युमुखी पडलेला दलित कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मात्र पोलिसांचीच तळी उचलून धरली. नाशिकमध्ये थेट लाँगमध्येच त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, अशी भूमिका मांडली. आ. सुरेश धस यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चौफेर टिकास्त्र सोडले जात आहे. संतोष देशमुख मराठा म्हणून वेगळा न्याय आणि सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा म्हणून वेगळा न्याय का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
परभणी येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या विटंबनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदमध्ये उसळलेल्या हिंसाचाराला जबाबदार धरून पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवून शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक करून तुरूंगात डांबले.
आधी पोलिस कोठडी राहून नंतर न्यायालयीन कोठडीत गेलेला आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असतानाच मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांकडून झालेला अमानुष छळ आणि मारहाणीमुळेच झाल्यामुळे त्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्रभरातील आंबेडकरी समाज, विविध संघटना आणि नेत्यांकडून लावून धरण्यात आली.
दिवंगत दलित पँथर विजय वाकोडे आणि उच्च शिक्षित आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्यावा, अशी मागणी घेऊन परभणीहून लाँगमार्च काढण्यात आला. परभणीतून निघालेला हा लाँगमार्च मुंबईत मंत्रालयात धडकणार होता. परंतु हा लाँगमार्च नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री मेघना बोर्डीकर या लाँगमार्चमधील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. त्यांनी आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा लाँगमार्च मागे घेण्यात आला. तेथे बोलताना आ. सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, असे जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले आ. सुरेश धस?
परभणीहून निघालेल्या लाँगमार्चमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत म्हणून आ. सुरेश धस आणि मंत्री मेघना बोर्डीकर नाशिकमध्ये पोहोचल्या. तेथे आंदोलकांसमोर बोलतानाचा आ. सुरेश धस यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओतील आ. सुरेश धस यांचे वक्तव्य असेः
‘फकत पोलिसांच्यावरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटते संयुक्तिक होणार नाही. त्यांची बऱ्यापैकी कानउघाडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये, असे माझे मत आहे रविभाऊ… त्याच्याउपत तुम्ही जसं म्हणाल तसं…१५६(३) चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे. बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता. परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाचं जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनानी…मोठ्या मनानी तसं काही गोष्टीत माफ करावं, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो’, असे आ. सुरेश धस म्हणाले.
आ. धसांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
एकीकडे आ. सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका, त्यांना माफ करा, असे सांगतानाच आंदोलनकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम १५६(३) चा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. याचाच अर्थ राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचेच झाल्यास आता आंदोलनकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम १५६(३) अन्वये न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपासाचे आदेश देण्याची मागणी करावी लागणार आहे. त्यासाठी मोठा न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे, हेच यातून स्पष्ट झाले आहे.
आ. धस यांची भावनाच वर्णवर्चस्ववादीः आ. आव्हाडांचा हल्लाबोल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीडमध्ये निघालेल्या मोर्चात आ. सुरेश धस यांच्यासोबत सहभागी झालेले आणि या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी आ. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्यामध्ये एवढेच क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे, असा हल्लाबोल आ. आव्हाड यांनी चढवला आहे.
‘दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्याने येऊन जाऊ द्या, त्याला माफ करा, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणाऱ्यास कळू नये, याला काय म्हणावे? सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच, याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे,’ असे ट्विट आ. आव्हाड यांनी केले आहे.
‘सोमनाथ सूर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मुलात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खूनाला माफी नाही. हा खूनच आहे… अक्षय शिंदेचा खूनच आहे, सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खूनाला माफी नाही,’ असेही आ. आव्हाड यांनी आ. सुरेश धस यांना बजावले आहे.
आ. धस यांच्यावरही ॲट्रॉसिटी कराः राहुल प्रधान
युवा पँथरचे नेते राहुल प्रधान यांनीही आ. सुरेश धस आणि मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अन्याय करणारेच कधीपासून न्याय द्यायला लागलेत? असा सवाल करत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलता येत नाही, ते त्यांनी आ. धसांच्या तोंडून बोलून घेतले, असा आरोपही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. ॲट्रॉसिटीमधील आरोपींची बाजू घेणारे आ. धस यांच्यावरही ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘फडणवीसांचा चमचा ‘दूत’ धस म्हणाले, ‘परभणी प्रकरणात पोलिसांवरती गुन्हे दाखल करणे हे संयुक्तिक होणार नाही. पोलिसांची बऱ्यापैकी कानउघाडणी आता डिपार्टमेंटने केलेली आहे. मोठ्या मनाने पोलिसांना माफ करून टाका’. हे मुख्यमंत्री फडणवीस धस यांच्या तोंडून बोलत आहेत. फडणवीसांना जे बोलता येत नाही, ते धस यांच्या तोंडून बोलून घेतात. यासोबतच पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणतात की, ‘संविधानाला सर्वोत्तम मानत प्रधानमंत्री मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करतात. हे सर्व पोलिस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत होते.’वाजवा टाळ्याSSS, असे ट्विट राहुल प्रधान यांनी केले आहे.
‘ज्या खूनी पोलिसांनी निर्दयपणे निष्पाप तरूंणासह तरुणी आणि महिलांना क्रूरपणे मारहाण करत गाड्यांसह घरादारांची मोडतोड केली. सोमनाथचा जीव घेतला. वच्छलाबाई मानवते यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत लैंगिक छळ केला. सोबतच अश्लील शिवीगाळ करत जीव जाईपर्यंत हालहाल करून मारले. हे सगळे याच पोलिसांनी केले. हे धक्कादायकपणे क्रूर आणि अमानुष असण्याची गुणवत्ता दर्शवते. त्यामुळेच पोलिस निरीक्षक घोरबांड, पोलिस निरीक्षक मरे, पोलिस निरीक्षक तुर्नर यांच्यासह ईतर पोलीस कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाच्या गुन्ह्यासोबत कलम ३०७, ३५४ ॲट्रॉसिटी ॲक्ट ३(१) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या ॲट्रॉसिटी ॲक्टमधील आरोपींची बाजू घेणारा फडणवीसांचा चमचा “दूत” धस यांचेवर ही ॲट्रॉसिटी दाखल केली पाहिजे’ असेही राहुल प्रधान यांनी म्हटले आहे.
