छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झालेले डॉ. विजय फुलारी हे आजच पदभार स्वीकारण्याची शक्यता असून माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी गेल्या साडेचार वर्षांत ठरवून विस्कटून टाकलेली विद्यापीठाची शैक्षणिक घडी नीट बसवून ‘नॅक’चे ए मानांकन टिकवणे हेच त्यांच्या समोरील पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान ते कसे पेलतात, यावरच त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
राज्यपाल तथा महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. फुलारी हे या आधी दोनवेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या शर्यतीत होते. २०१९ मध्ये ते ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांत होते आणि कुलपतींनी त्यांची मुलाखतही घेतली होती. त्याआधी कुलगुरू शोध समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांत त्यांचा समावेश होता. दोन्ही वेळा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाने हुलकावणी दिली मात्र तिसऱ्या वेळी मात्र ते याच विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होण्यात यशस्वी झाले आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (एबीव्हीपी) पार्श्वभूमी असलेले डॉ. फुलारी यांची संशोधन आणि अध्यापकीय कारकीर्द ताकदीची राहिली आहे. त्यांच्यात मोठी शैक्षणिक क्षमता असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला त्यांच्या या क्षमतांचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
साडेचार वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची धुरा सांभाळून डॉ. प्रमोद येवले हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी नियत वयोमानुसार निवृत्त झाले. डॉ. येवले यांनी त्यांच्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीत विद्यापीठाची शैक्षणिक घडी ठरवून विस्कटवून टाकली. या काळात विद्यापीठात शैक्षणिक कामाजाला प्राधान्यच मिळाले नाही. एका विशिष्ट जातीचेच राजकारण करण्यात त्यांनी धन्यता मानली.
डॉ. येवले यांचा भर विद्यापीठ परिसरात बांधकामे आणि विविध इमारतीतील चांगल्या फरशा तोडून नवीन फरशा बसवण्यावरच राहिल्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत विद्यापीठात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिषदा, सेमिनार, चर्चासत्रे अशा फारशा घडामोडी झाल्या नाहीत. असे प्रस्ताव घेऊन जाणाऱ्या प्राध्यापक/ विभागप्रमुखांना डॉ. येवले यांनी थाराच दिला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अकॅडमिक प्रोफाइलचा चांगलाच विचका झाला आहे.
मार्च २०२४ मध्ये विद्यापीठाच्या ‘नॅक’ मानांकनाची मुदत संपत आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या आत विद्यापीठाला पुन्हा नॅकला सामोरे जावे लागणार आहे. पुन्हा ‘नॅक’ला सामोरे जायचे झाल्यास विद्यापीठाची शैक्षणिक घडामोडींची पाटी कोरीच असल्यामुळे सध्याचे नॅकचे ‘ए’ मानांकन टिकवायचे कसे? हा खरा आणि मोठा प्रश्न आहे. कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. फुलारी यांच्यासमोर हेच पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
डॉ. फुलारी ३५ वर्षांपासून अध्यापन आणि २७ वर्षांपासून संशोधन कार्यात सक्रीय आहेत. त्यांनी ९ विद्यापीठांत नॅक मूल्यांकनकर्ता म्हणून काम केले आहे तर २३ विद्यापीठांना नॅक मूल्यांकन व मान्यतेसाठी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १५७ संशोधक छात्रांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी मिळवली आहे. त्यांचे १५० रिसर्च पेपरही प्रकाशित झालेले आहेत.
डॉ. फुलारी यांनी विविध विद्यापीठांच्या समित्यांवरही काम केलेले असल्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी नेमके काय करायला हवे, याचा चांगलाच अंदाज त्यांना आहे. त्यांच्यात असलेली शैक्षणिक क्षमता आणि अध्यापकीय तसेच संशोधन क्षेत्रातील अनुभव याची सांगड घालून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अकॅडमिक लिडरशीप द्यावी लागणार आहे.
डॉ. फुलारींच्या नेतृत्वात कोणते गुण?
विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करण्याची आवड निर्माण करणे, समाजाशी बांधिलकी, संघ बांधणी (टीम या अर्थाने) आणि निर्णायकता हे आपल्यातील नेतृत्वाचे गुण आहेत, असे डॉ. फुलारी सांगतात. त्यांच्या या नेतृत्व क्षमतांची पहिली कसोटी विद्यापीठाचे नॅकचे आहे ते ‘ए’ मानांकन टिकवण्यातच लागणार आहे. नॅकचे ‘ए’ मानांकन टिकले नाही तर त्यांच्या कारकीर्दीवर हा पहिलाच धब्बा लागणार असून मी नवीन आहे, असे म्हणून त्यांना अंग काढून घेता येणार नाही.
प्राध्यापक-कुलगुरू संवाद हरवला
डॉ. बी.ए. चोपडे हे कुलगुरू असताना विद्यापीठातील प्राध्यापक/विभागप्रमुख हे मोकळेपणाने त्यांच्याकडे प्रस्ताव, प्रश्न आणि समस्या घेऊन जायचे आणि ‘वेलकम मिस्टर प्रोफेसर’ म्हणून डॉ. चोपडे हे त्यांचे स्वागत करायचे. डॉ. चोपडेंचा कार्यकाळ संपला आणि अध्यापक म्हणून काम केल्याची सेवापुस्तिकाही नसलेले डॉ. प्रमोद येवले यांची कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर प्राध्यापक-कुलगुरूंमधील हा संवादच हरवला. डॉ. येवलेंनी भेटीसाठी आलेल्या प्राध्यापक-विभागप्रमुखांना तासनतास ताटकळत ठेवून त्यांची मानहानी केली.
मी ‘हुकुमशहा’ आहे, असे अभिमानाने सांगणाऱ्या येवलेंच्या या स्वभावामुळे प्राध्यापक-विभागप्रमुख त्यांच्याकडे फिरकेनासे झाले. त्याचा एकंदर परिणाम विद्यापीठाच्या शैक्षणिक घसरणीत झाला. डॉ. फुलारी यांना हा हरवलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करावा लागणार आहे. माहितीचे अदान-प्रदान आणि संवाद क्षमता वाढीला प्रोत्साहन हे आपल्या व्यक्तिमत्वाचे परस्पर संवाद आणि सहयोगी कौशल्य असल्याचा दावा डॉ. फुलारी करतात. या कौशल्याचा ते कसा व्यवहार्य वापर करतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
‘अजेंडा’हवाच,पण फक्त ‘अकॅडमिक’
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे आंबेडकरी आणि परिवर्तनवादी चळवळीचे संवेदनशील केंद्र आहे. डॉ. प्रमोद येवलेंनी त्यांच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठात प्रतिगामी विचारांना खतपाणी घालण्याचे प्रयत्न करून पाहिले, परंतु हाणून पाडण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करताना डॉ. फुलारी यांना सामाजिक भान राखून विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्थानासाठी ‘अकॅडमिक अजेंडा’च राबवावा लागणार आहे. त्यांनी आरएसएस-भाजपचा ‘अजेंडा’ राबवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचीच जास्त शक्यता आहे.
प्राध्यापक विजय जनार्दन फुलारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व स्वागत पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठांमध्ये रुजवली जाईल.पुन्हा: हार्दिक अभिनंदन…