नांदेडः नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवामुळे राज्यभर खळबळ उडाली आणि आरोग्य यंत्रणेवर सार्वत्रिक टिकेची झोड उठली असतानाच याही परिस्थितीत मंगळवारी या रुग्णालयात जाऊन ‘चमकोगिरी’ करणे हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या हातात झाडू देऊन त्यांना शौचालयाची स्वच्छता करायला लावून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी हेमंत पाटील यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. अपुरे मनुष्यबळ आणि औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत्यूचे हे तांडव समोर आल्यानंतर अनेक नेते, मंत्री या रुग्णालयाला भेट देत आहेत आणि पाहणी करत आहेत.
हिंगोलीचे शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील हेही मंगळवारी दुपारी आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात आले होते. रुग्णालयातील वॉर्डांची पाहणी करत असताना त्यांना वॉर्डातील शौचालय अस्वच्छ असल्याचे दिसले. यावरून ते संतापले आणि त्यांनी चक्क रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन त्यांना त्यांचे कार्यालय आणि रुग्णालयातील शौचालयाची सफाई करायला लावली.
खासदार हेमंत पाटील केलेल्या या ‘चमकोगिरी’चे व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले. काही जणांनी त्यांच्यावर टीकाही केली. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्याच हातात झाडू देऊन त्यांना अपमानास्पद वागणूक देणे आणि त्यांच्याकडून शौचालयाची सफाई करून घेणे खा. हेमंत पाटील यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खा. हेमंत पाटील आणि इतरांविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ऍट्रॉसिटी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत. ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आता त्यांच्याच विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खा. पाटलांविरुद्ध आंदोलनाचा मार्डचा इशारा
खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठातांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीचे पडसाद उमटू लागले आहेत. सेंट्रल मार्डने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून खा. पाटील यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मार्डने दिला आहे.
हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तणुकीमुळे अधिष्ठातांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. संपूर्ण डॉक्टरांसाठी ही अपमानास्पद बाब आहे असे सांगत सेंट्रल मार्डने खा. हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असेही सेंट्रल मार्डने म्हटले आहे.