मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन शिंदे- फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आले. परंतु आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी फडणवीस सरकाराने कंबर कसली असून चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. अपात्र ठरवल्या गेलेल्या महिलांना आजवर दिले गेलेले या योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कमही परत द्यावी लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. त्यानुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना पाच हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे आपणाला आता दरमहा २१०० रुपये मिळणार, या आशेवर असलेल्या अनेक लाडक्या बहिणींचा मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात या योजनेच्या २ कोटी ३४ लाख लाभार्थी महिला आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बोगस लाभार्थ्यांनी घेतल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आता फडणवीस सरकारने कंबर कसली असून ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतला आहे, त्यांची माहिती उघड केली जाणार आहे.
फडणवीस सरकारकडून घेतल्या जात असलेल्या झाडाझडतीमुळे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे १० हजार महिलांची नावे समोर आल्याची माहिती असून या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र घोषित केले जाणार आहे. नजीकच्या काळात अशा अनेक महिलांची नावे अपात्र लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट होतील.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाणनी सुरू करण्यात आली आहे. या छाणनीत अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने किंवा अपूर्ण अर्ज केल्याचे समोर आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिलेल्या महिलांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांना आजवर देण्यात आलेली रक्कम परतही करावी लागण्याची शक्यता आहे.
कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र?
- ज्या महिलांच्या कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त संयुक्तपणे शेतजमीन आहे, अशा कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरतील.
- ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्या महिलांनाही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल. चारचाकी वाहनातून ट्रॅक्टर वगळण्यात आले आहे. म्हणजेच ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे, त्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही.
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील.
- इन्कम टॅक्स भरणाऱ्या कोणत्याही कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी खात्यात नियमित, कायमस्वरुपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल, त्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक स्वराज संस्थेत किंवा कोणत्याही महामंडळात काम करत असतील किंवा कुटुंबातील सदस्यास निवृत्ती वेतन मिळत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
- ज्या महिला सरकारच्या अन्य कोणत्याही योजनेतून आर्थिक लाभ घेत असतील तर अशा महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
२१०० रुपये केव्हा मिळणार?
महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे ही वाढीव रक्कम कधी मिळणार? याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत आहेत. मात्र वाढीव निधी प्राप्त होण्यासाठी लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. या योजनेचा पुडील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील, याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत असतानाच बाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.