नवी दिल्लीः नव्या वर्षात म्हणजेच २०२५ पासून ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम थेट एटीएममधून काढता येणार आहे. कामगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही मोठी घोषणा केली. देशातील ईपीएफओ सदस्यांना अत्याधुनिक सेवा प्रदान करण्यासाठी ईपीएफओ आपली माहिती तंत्रज्ञान प्रणाली उन्नत करत आहे, असे डावरा म्हणाल्या.
ईपीएफओ सदस्य पुढील वर्षापासून एटीएमद्वारे भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढू शकतील. त्यामुळे लोकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होईल, असे डावरा म्हणाल्या.
पीएफधारकांचे जीवनमान अधिक सुकर व्हावे म्हणून आम्ही पीएफचे क्लेम लगेचच सेटल कर आहोत. ही प्रक्रिया आणखी सोपी व्हावी म्हणून आम्ही काम करत आहोत. पीएफचे दावेदार, लाभार्थी आणि विमाधारक व्यक्ती कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह एटीएमद्वारे त्यांच्या दाव्याची रक्कम सहजपणे काढू शकतील, असे डावरा म्हणाल्या.
ईपीएफओची प्रणाली विकसित होत आहे आणि तुम्हाला दर दोन-तीन महिन्यांनी महत्वपूर्ण सुधारणा झालेल्या दिसतील. जानेवारी २०२५ पर्यंत या प्रणालीत मोठी सुधारणा होईल, असे मला वाटते, असे डावरा म्हणाल्या.
नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी ईपीएफओ सेवा सुधारण्यावर सरकारचा भर आहे. कर्मचारी भविष्य निवार्ह निधी संघटनेचे (ईपीएफओ) देशात सध्या ७ कोटी सक्रीय सदस्य आहेत. भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देण्याची १२ टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे. ही मर्यादा काढून टाकल्यास कर्मचारी त्यांना हवे तितके योगदान भविष्य निर्वाह निधीमध्ये देऊ शकतील.
कशी असेल नवी प्रणाली?
- ईपीएफओ आता पीएफधारकांना बँकांप्रमाणे एटीएम कार्ड देईल. त्याच्या मदतीने थेट पैसे काढता येऊ शकतील. म्हणजेच पीएफधारकांना त्यांच्या पीएफचे पैसे काढण्यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही किंवा ईपीएफओ कार्यालयात जावे लागणार नाही.
- एटीएमद्वारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकांच्या एटीएमवर उपलब्ध असणार नाही. ईपीएफओ निवडक बँकांशी याबाबत करार करणार आहे. पीएफधारकांना दिलेले एटीएम कार्ड ईपीएफओने ज्या बँकांशी करार केला आहे, अशाच बँकांच्या एटीएमवरमध्ये वापरता येईल.