मुंबईः राज्य विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या दोनशेहून अधिक आमदारांनी शपथ घेतली. परंतु आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांना दोन ओळींच्या शपथग्रहण मसुद्यातील एक शब्दही नीट वाचता आला नाही. हंगामी अध्यक्षांनी पाडवी यांना शब्द न शब्द सांगूनही त्यांना ते म्हणता आला नाही. शपथविधी दरम्यान आ. पाडवी यांचा उडालेला गोंधळ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. त्यांनी हिना गावीत यांचा पराभव केला आहे. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत हिना गावीत यांना पराभूत करून आमश्या पाडवी विजयी झाले. आज आ. पाडवी यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली परंतु त्यांना दोन ओळींच्या शपथग्रहण मसुद्यातील एकही शब्द नीट वाचता आला नाही. त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आमशा पाडवी हे विधानसभेत आमदारकीची शपथ घेण्यास उभे राहिले तेव्हा त्यांना छापील स्वरुपातील शपथग्रहण मसुदा देण्यात आला होता. ‘मी आमश्या फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्याने शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन,’ एवढा दोनच ओळींचा शपथग्रहण मसुदा होता.
हा दोन ओळींचा शपथग्रहण मसुदा त्यांना वाचता येत नसल्यामुळे हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथग्रहण मसुद्यातील शब्द न शब्द सांगितला. परंतू त्यांना सांगितलेले शब्दही नीट उच्चारता आले नाही. त्यातही त्यांनी अनेक चुका केल्या. पहा व्हिडीओ