उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे ठराव; नव्या वादाची शक्यता


मुंबईः  उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, असा महत्वाचा ठराव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला असून हा प्रस्ताव शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ही माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. २३ जानेवारी रोजी बीकेसीमध्ये शिवसेनेचा हा भव्य मेळावा होणार आहे, असे कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या बैठकीनंतर दिली. या प्रस्तावावरून आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष कसे होऊ शकतात?  बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांची या समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली पाहिजे, असे रामदास कदम म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा संबंध राहता कामा नये, याची खबरदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले तर बाळासाहेब ठाकरेंना खूप दुःख होईल. त्यांच्या मनाला वेदना होतील. माझे विचार ज्यांनी पायदळी तुडवले, तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो, असा विचार ते करतील. त्यामुळे ही बाब होणे आवश्यक आणि गरजेची आहे, असे रामदास कदम म्हणाले.

नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता वाद

नोव्हेंबर २०२२ मध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकावरून वाद झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीवरून मोठा वाद झाला होता. आता शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांची या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी केली आहे. ही मागणी जर मान्य झाली तर पुन्हा मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!