छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठातील अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करून हस्तक्षेप करू नका, अशी तंबी चार महिन्यापूर्वीच राज्यपाल तथा कुलपतींनी देऊनही राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांची ढवळाढवळ आणि अधिकाऱ्यांशी अरेरावी थांबली नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने पुन्हा कुलपती तथा राज्यपालांकडे डॉ. सानप यांची लेखी तक्रार केली आहे. आता राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. सानप यांच्याविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे विद्यापीठ वर्तुळातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
डॉ. गजानन सानप यांची राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यापासूनच त्यांचा विद्यापीठातील वावर मालकाच्या थाटात राहिला आहे. आपण राज्यपालांचे प्रतिनिधी आहोत, असे सांगत विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी ते उद्धटपणे बोलतात, त्यांना निलंबित किंवा बडतर्फ करण्याच्या धमक्या देतात, अशा तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. आता डॉ. सानप यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना अर्वाच्च भाषा वापरत अरेरावी केल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने आक्रमक भूमिका घेत डॉ. सानप यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉ. सानप हे आरएसएसची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपचे कार्यकर्ते आहेत.
२३ जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनात डॉ. गजानन सानप यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना अरेरावीची भाषा वापरून अपमानित केले. हा अपमान सहन न झाल्यामुळे डॉ. गवळी यांनी संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
कुलगुरूंच्या दालनात घडलेल्या या प्रकारामुळे विद्यापठातील सर्व महिला अधिकारी व इतर सर्व कर्मचारी धास्तावले असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचारी दडपणाखाली काम करत आहेत. या सर्व प्रकाराचा विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
विद्यापीठाचे कामकाज निर्भयपणे चालावे आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी डॉ. गवळी यांच्यावर झालेली अरेरावी आणि त्या पदाचा अवमान केल्याबद्दल डॉ. गजानन सानप यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने राज्यपाल तथा कुलपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. भारती गवळी यांच्यासह विद्यापीठातील ८९ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विद्यापीठातील परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनीही कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनात सविस्तर घटनाक्रम कथन करण्यात आला असून डॉ. गजानन सानप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षा विभागात कार्यरत असलेले प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.बी. चव्हाण यांची पाठराखण करत डॉ. गजानन सानप यांनी डॉ. गवळी यांना अरेरावी करत अत्यंत अर्वाच्च भाषा वापरल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
उपद्व्यापी कर्मचाऱ्याची पाठराखण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.बी. चव्हाण हे परीक्षा विभागात बदलीने रूजू झाल्यापासून कोणत्याही एका कक्षात नीटपणे काम करत नाहीत. कामापेक्षा त्यांचे उपद्व्यापच जास्त असल्याने इतर कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा त्रास होतो. परीक्षा विभाग अत्यंत संवेदनशील विभाग असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कार्यतत्पर रहावे लागते.
एस. बी. चव्हाण हे अधिसभा सदस्य झाल्याने परीक्षा विभागात त्यांना स्वतंत्र दालनाची व स्वतंत्र कार्यभार देण्याची मागणी करण्यात आली आहे. परीक्षा विभागामार्फत ही मागणी पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे परीक्षा विभागावर चव्हाण यांनी दबाव वाढवत अडवणूक सुरू केली. त्यामुळे त्यांची बदली बी.एस्सी. कक्षातून पदवी कक्षात करण्यात आली. तेथेही ते कामापेक्षा इतर अनावश्यक कृतीच करू लागल्यामुळे पदवी कक्षातून त्यांची बदली पीएच.डी. कक्षात करण्यात आली.
या बदलीला डॉ. गजानन सानप यांनी विरोध केला आणि डॉ. भारती गवळी यांच्याशी कुलगुरूंच्या समक्षच अत्यंत अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. व्यवस्थापन परिषद सदस्याने केलेला हा प्रकार निंदनीय आणि घृणास्पद आहे. त्यामुळे गैरवर्तन करणारे अधिसभा सदस्य एस.बी. चव्हाण आणि त्यांना पाठिशी घालणारे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
चार महिन्यांपूर्वीच दिली होती कुलपतींनी तंबी
या आधी ५ जुलै २०२४ रोजी डॉ. गजानन सानप यांनी प्र-कुलगुरूंच्या दालनात निरंतर शिक्षण व विस्तारसेवा विभागाचे संचालक डॉ. आनंद वाघ यांच्याशी अरेरावी करत त्यांना निलंबित/बडतर्फ करण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार छावा प्रतिष्ठानच्या वतीने कुलपतींकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कुलपतींनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडून अहवाल मागवला होता. १२ सप्टेंबर २०२४ रोजी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कुलपतींकडे सविस्तर अहवाल पाठवला होता. डॉ. गजानन सानप यांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह होते. त्यांनी डॉ. वाघ यांना निलंबित/बडतर्फ करण्याची धमकी दिल्याचे पुरेसे पुरावे आहेत, असे कुलगुरूंनी या अहवालात म्हटले होते.
कुलगुरूंचा हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यपालांचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी कुलपती तथा राज्यपालांच्या आदेशाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ. गजानन सानप यांना पत्र पाठवून विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात ढवळाढवळ करून हस्तक्षेप करू नका, अशी तंबी दिली होती.
तरीही डॉ. गजानन सानप यांची ढवळाढवळ आणि हस्तक्षेप थांबलेला नाही, हे डॉ. भारती गवळी प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे आरएसएस-अभाविपचे कार्यकर्ते असलेल्या डॉ. गजाजन सानप यांच्याविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे विद्यापीठ वर्तुळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.