छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत शेंद्रा परिसरातील वाल्मिकराव दळवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील सामूहिक कॉपीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने बुधवारी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मायमराठीचे पुरते मातेरे करत अशुद्ध मराठीत लिहिले फलक हातात धरलेले होते. त्यामुळे घोषणाबाजी करत विद्यापीठाच्या कारभारावर टीका करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या अगाध ज्ञानाच्या ‘कारबारा’चे दर्शनच या आंदोलनापेक्षाही जास्त चर्चेचा विषय ठरला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्याच दिवसापासून उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गणेश मंझा यांची या पदावरून तातडीने उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी डॉ. भारती गवळी यांची नियुक्ती केली. नवा संचालक मिळाल्यानंतर तरी परीक्षा सुरळीत होतील, अशी त्यामागची अपेक्षा होती, मात्र गोंधळ तर सुरूच राहिला आणि सामूहिक कॉपीचे नवेच प्रकरण उघडकीस आले.
साई सकल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शेंद्रा येथे चालवल्या जाणाऱ्या वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. परीक्षा संपल्यावर केवळ तीनशे रुपयांत विद्यार्थ्यांना सायंकाळी उत्तरपत्रिका दिली जायची. जवळच्याच झेरॉक्स सेंटरवर त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका लिहिण्याची व्यवस्था केली जायची. उत्तरपत्रिका लिहून झाली की हेच विद्यार्थी परीक्षा केंद्रात जाऊन ती उत्तरपत्रिका गठ्ठ्यात ठेवायचे, असा हा प्रकार सुरू होता. एका विद्यार्थीनीच्या धाडसामुळे हा प्रकार उघडकीस आला.
ज्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयात सामूहिक कॉपीचे हे प्रकरण घडले, त्या महाविद्यालयाचे संस्थाचालक ज्ञानेश्वर दळवी हे भाजपशीच संबंधित आहेत. भाजप पुरस्कृत कोचिंग क्लासेस असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याच महाविद्यालयाविरोधात आंदोलन करत आरएसएसची विद्यार्थी आघाडी असलेल्या अभाविपने संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे भाजपशी संबंधित असलेल्या संस्थाचालकाविरुद्ध अभाविपने आंदोलन कसे केले? अशी चर्चाही विद्यापीठ परिसरात ऐकायला मिळाली.
आघाव यांच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समितीचा आग्रह
या आंदोलनानंतर विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या आरएसएस-अभाविपशी संबंधित एका सदस्याने कुलगुरूंची भेट घेतली आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स.भु. महाविद्यालयाचे आघाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. आघाव आणि फॉरेन्सिक सायन्सचा काय संबंध? असा प्रश्न तेथे उपस्थित असलेल्या अन्य एका अधिसभा सदस्याने केला. त्यामुळे कुलगुरू आता आघाव यांचीच समिती नेमणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अभाविपच्या ज्ञानाच्या अगाध ‘कारबारा’चे दर्शन
अभाविपने या आंदोलनात जे कार्यकर्ते आणले होते, त्यांच्या हातात मराठी भाषेचे पुरते मातेरे केलेले आणि प्रचंड अशुद्ध भाषेत लिहिलेले फलक होते. या फलकांवर कारभाराऐवजी ‘कारबार’, खुर्चीऐवजी ‘कुर्ची’ असे शब्द लिहिलेले होते. त्यामुळे एबीव्हीपीने या आंदोलनात पाठवलेले कार्यकर्ते खरेच महाविद्यालयीन शिक्षण घेणारे होते का? तसे ते असतील तर त्यांना हातातील फलक नीट लिहिण्यापुरतेही जुजबी मराठी सुद्धा कसे येत नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे कॉपीमुक्ती आणि गुणवत्तेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ज्ञानाच्या अगाध ‘कारबारा’चे दर्शनच या आंदोलनापेक्षाही जास्त चर्चेचा विषय ठरला आहे.
‘आपला माणूस आहे, सांभाळून घ्या’चा सांगावा’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अभाविपने या महाविद्यालयाविरुद्ध कारवाईची मागणी किंवा आंदोलन करू नये, अशी काही स्थानिक भाजप नेत्यांचीच इच्छा होती. संस्थाचालकाच्या विनंतीवरून काही स्थानिक भाजप नेत्यांनी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर राज्यपालांनी नामनिर्देशिक केलेल्या एका सदस्याला फोन करून तसा सांगावाही दिला. आपला माणूस आहे, सांभाळून घ्या, अशी विनंतीवजा सूचनाही फोनवरून करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. तरीही विद्यापीठात अभाविपचे हे आंदोलन झाले.